पुणे : देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी संतापाची लाट पसरली आहे. पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. नीट परीक्षेत झालेल्या गोधळांचा मुद्दा या कॉकरोच जनता पार्टीने उचलून धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या उपस्थितीत ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल. आज कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद बोलताना केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
अभिजित दीपके यांनी आज (११ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी येत्या २० जून रोजी दिल्लीत आणखी मोठे आंदोलन केले जाईल, अशी माहिती दिली. आम्ही सध्या पुण्यात आंदोलन करत आहोत. आमच्यासोबत पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर २० तारखेला सगळ्यांनी दिल्लीला जायचं अन् धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटायचं नाही असंही दीपके यांनी म्हटलं आहे.
पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे...
अभिजित दीपके यांनी आजच्या पुण्यातील आंदोलनाबाबत माहिती देताना म्हटलं की, आज संध्याकाळी शांततापूर्ण आंदोलन होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही शिक्षणाबद्दल आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. सोनम वांगचुक देखील आंदोलनात सहभागी होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील दीपकेंनी केले आहे. माझ्यासाठी पुणे होम ग्राउंड आहे. या पुढे नागपूरमध्ये जाणार आहे. आम्ही सरकारची चर्चा तयार आहे, मात्र ते आमचे अकाउंट बंद करत आहे, ही कसली पद्धत आहे? आजचं आंदोलन हे जंतर मंतर पेक्षा मोठं होईल हा विश्वास आहे, आम्ही कुठल्या राजकीय पक्ष विरोधात नाहीतर विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत आहोत, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं आहे.
कॉकरोच जनता पार्टी हा एक मोठा मेसेज देशासाठी आहे. विद्यार्थीसाठी हे सर्व आहे, याला फेक म्हणू नका. शेतकर्यांच्या आंदोलनात ही सहभागी होऊ पण आधी हा प्रश्न ही आम्ही लावून धरला आहे. २० तारखेला सर्वांनी दिल्लीला जायचं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय तिथून माघारी यायचं नाही, असंही दीपके यांनी यावेळी सांगितलं आहे.
बाप रे !! मी आणि मोदी? त्या फोटोबाबत अभिजीत दिपके नेमकं काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली आणि या दोघांमधील भेटीनंतरच दिपके भारतात आल्याचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवाय आपण दिपके आणि मोदींच्या भेटीचे फोटो बघितल्याचा खळबळजनक दावा देखील राऊतांनी केला आहे. आता राऊतांचा हाच दावा अभिजीत दिपके यांनी फेटाळून लावला आहे. याबद्दल बोलताना, ते म्हणाले, अरे बापरे मी आणि मोदी? मला माहिती नाही तो एआय जनरेटेड फोटो असू शकतो. मी मोदींना कसं भेटू शकतो? तुम्हाला प्रोटॉकॉल तुम्हाला माहिती आहेत.मी एक साधा विद्यार्थी आहे. १५ दिवसांपूर्वी मी यूएसमध्ये जॉबसाठी अप्लाय करत होतो. अशी पार्टी काढण्याचा माझा काही हेतू नव्हता, जर तसा माझा प्लॅन असता तर मी तिकडे गेलो नसतो भारतात बसून हे सर्व केले असते. पण २ कोटींपेक्षा जास्त लोक एक प्लॅटफॉर्म तयार करतायत तर ते राजकीय पक्षांना काही इशारा देत आहेत आणि त्यांनी तुमच्याकडून आपेक्षा सोडल्या आहेत, असही दिपके यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली आणि त्या मिटींगनंतरच दिपके भारतात आहेत. या दोघांच्या भेटीचे फोटो मला एका व्यक्तीने पाठवले आहेत. शिवाय मोदींच्या भेटीनंतर दिपके भारतात आल्याचं लोक बोलत आहेत. याबाबतची माहिती आम्ही घेऊ, परंतु आम्ही त्यानच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.